GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला पुन्हा गळती; वाहनचालक हैराण, तातडीच्या उपाययोजना सुरू

खेड ई: मुंबई-गोवा महामार्गावरील बहुप्रतिक्षित कशेडी बोगद्याला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी गळती लागल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, बोगद्यातून प्रवास करताना वाहनचालकांना चक्क पावसाचा अनुभव येत असून, सिमेंटच्या बांधकामातून पाण्याचे फवारे बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

दोन किलोमीटर लांबीचा हा कशेडी बोगदा दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून खुला करण्यात आला आहे. भर उन्हाळ्यातही या बोगद्यात पाण्याची गळती सुरू होती. मात्र, आता पावसाळ्याला सुरुवात होताच ही समस्या अधिकच वाढली आहे. बोगद्यातून कोसळणारे पाण्याचे धबधबे आणि फवारे यामुळे वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत.

या गंभीर समस्येची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी बोगद्याची पाहणी केली आहे. कशेडी बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून सध्या गळती थांबवण्यासाठी आणि वाहनांवर थेट पडणारे पाणी रोखण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या उपाययोजना किती प्रभावी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महामार्गावरील या महत्त्वाच्या बोगद्यातील गळतीमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुलभ प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article