पनवेल : शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर ७ परिसरात अनैतिक संबंधाच्या वादातून सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेनंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
२५ सप्टेंबर रोजी रात्री ८.३७ वाजता डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीनंतर बिट मार्शल ०५ चे पोलीस अंमलदार पोलिस हवालदार विलास कारंडे व पोलिस हवलदार राजेंद्र केणी घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे (वय २८) हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला राहत्या घरीच पकडले. प्राथमिक चौकशीत आरोपी नागेश काळे याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तु वाल्या काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने रागाच्या भरात डोक्यात दगड घालून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी दत्तु काळे यांचा मुलगा दीपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नागेश काळे याला अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून घडलेला सख्ख्या भावाचा खून आणि पोलिसांची वेगवान कारवाई यामुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.
पनवेल: सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून संपवले
