चिपळूण: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सक्षम तू हा विशेष मार्गदर्शन उपक्रम चिपळूणमधील पाग येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात कै. गोविंदराव निकम आणि कै. अनुराधा निकम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या म्हणून चिपळूणच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मीरा महामुनी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राइम, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, पोस्को कायदा, स्वसंरक्षण आणि विद्यार्थ्यांवरील कायदेशीर परिणाम आदी कायदेविषयक विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल आणि समजूतदार भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना हा उपक्रम प्रेरणादायी आणि उपयोगी ठरणार आहे.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस दिशाताई दाभोळकर, शहराध्यक्षा अदिती देशपांडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख मनाली जाधव, जिल्हा उपाध्यक्षा रवीना गुजर, तालुका उपाध्यक्षा पूर्वा आयरे, सेजल कारेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुमेधा पांचाळ, मुख्याध्यापक शैलेश सुर्वे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधानाची प्रतिमा शाळेला भेट म्हणून देण्यात आली.
चिपळुणात ‘सक्षम तू’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागृती
