ताम्हाणे–कोसुंब मार्गावर रानगव्यांचा वावर; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

संगमेश्वर (प्रतिनिधी):- संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे–कोसुंब मार्गावरील गुरुकुलच्या माळरान परिसरात रविवारी सायंकाळी रानगव्यांचा मोठा कळप दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. सायंकाळी सातच्या सुमारास हा कळप रस्त्याच्या अगदी लगत वावरताना आढळल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात दहशतीचे सावट आहे.

​गेल्या काही दिवसांपासून या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत होते. मात्र, आज सायंकाळी ६.५० च्या सुमारास गुरुकुल परिसरातील माळरानावर गव्यांचा कळप थेट रस्त्यापाशी आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. हे गवे रस्त्याच्या अगदी जवळ असल्याने अचानक वाहनांसमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते, अशा वेळी वन्यप्राण्यांशी सामना झाल्यास मोठ्या अपघाताचा धोका नाकारता येत नाही.

​रानगव्यांच्या या दर्शनानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा आणि अत्यंत सतर्क राहावे, अशा सूचना देण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे केवळ वाहनचालकच नव्हे, तर परिसरातील शेतकरी आणि नागरिकही चिंतेत आहेत. वन विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *