रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; नोकरीवर गेलेल्या महिलेचा फ्लॅट फोडून दागिने, रोकड लंपास

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, बांधखिंड परिसरात दिवसाढवळ्या बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, बांधखिंड येथील शिवसृष्टी गृहनिर्माण संस्थेच्या वसुंधरा अपार्टमेंटमध्ये स्मिता संतोष सुर्वे वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे आपल्या घराला कुलूप लावून नोकरीसाठी बाहेर पडल्या होत्या. दुपारी तीन वाजता त्या कर्तव्यावरून घरी परतल्या असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप नसल्याचे धक्कादायक दृश्य दिसले. संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट उघड्या आणि अस्ताव्यस्त स्थितीत असल्याचे आढळले. अज्ञात चोरट्याने कपाट फोडून त्यातील सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रोकड पळवून नेल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

​घरफोडीचा हा प्रकार लक्षात येताच सुर्वे यांनी तातडीने शेजाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली आणि शहर पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्मिता सुर्वे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, परिसरातील माहिती संकलित करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *