GRAMIN SEARCH BANNER

मुंबईसह राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
240 Views

मुंबई: मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेसह केंद्रीय हवामान विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे की, राज्यातून पाऊस इतक्यात माघार घेणार नाही.

आधीच संततधार आणि मुसळधार पावसाने नागरिक हैराण झाले असताना येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण, संततधार ते मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राज्यात सध्या कुठे निरभ्र आकाश, कुठे ढगाळ वातावरण, तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. या बदलत्या वातावरणात शुक्रवारपासून पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागांत पावसासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाल्याने या अस्मानी संकटाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही स्थिती उद्भवली आहे. हे कमी दाब क्षेत्र दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकत असून, ते तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलून महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वारे आणि मुसळधार पावसाचे वातावरण तयार झाले आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भ या भागांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे यांसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडू शकतो. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतही पावसाची तीव्रता वाढेल. विदर्भातील बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करून प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. २७ आणि २८ सप्टेंबरला विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर भारतातून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनची माघार सुरू झाली असली तरी महाराष्ट्रात ते बंगालच्या उपसागरातील बदलांमुळे पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली होती. अशातच पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामान विभागाचे पुढील अंदाज लक्षात ठेवावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Total Visitor Counter

2648137
Share This Article