रत्नागिरी : शहरालगतच्या परिसरात १६ वर्षीय शाळकरी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहसिन दस्तगीर नदाफ (वय १९, रा. एकतानगर, खेडशी, रत्नागिरी) या तरुणास न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहसिन नदाफ हा सदर अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिची छेडछाड करीत होता. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मोहसिनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
तक्रारीनुसार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी पीडित मुलीचे वडील संशयित आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता, आरोपीने कार वेगाने चालवत तेथून पळ काढला. या वेळी त्याच्या बेदरकार वाहन चालवण्यामुळे अन्य काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर आणखी आरोपांची भर पडली.
अटकेनंतर आरोपी मोहसिन नदाफ याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या वतीने अॅड. सुहेल शेख यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
रत्नागिरी : १६ वर्षीय शाळकरी मुलीची छेडछाड; आरोपीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाकडून जामीन
