लांजा/वार्ताहर : धोकादायक धरणातून मृतदेह बाहेर काढणाऱ्या वेरळ पातेरे गावचे पोलीस पाटील महेश गजबाल आणि त्यांचे वडील वसंत गजबाल यांचा लांजा पोलिस ठाण्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
लांजा तालुक्यातील माजळ धरणामध्ये २० सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्घटनेत विशाल बाळकृष्ण माजळकर याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मृतदेह खोल पाण्यात अडकून पडल्याने बाहेर काढणे पोलिस प्रशासनासाठी अत्यंत कठीण ठरत होते. अशा परिस्थितीत महेश गजबाल व वडील वसंत गजबाल यांनी धाडस दाखवत मृतदेह बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या धैर्यशील कार्यामुळे मृतदेह बाहेर काढण्याचे काम शक्य झाले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपनिरीक्षक अमोद सरंगले, शिवस्वराज्य पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दिपक तरळ, उपाध्यक्ष राजेश मोरे, भडे पोलीस पाटील प्रशांत बोरकर, शिरंबवली पोलीस पाटील दर्शना सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
धोकादायक धरणातून मृतदेह बाहेर काढणाऱ्या गजबाल पिता-पुत्रांचा लांजा पोलिसांच्यावतीने सन्मान
