GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे व टेस्ला कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की जगातील सर्वात स्मार्ट कार भारतात येत आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून होत असून केंद्राच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपली सुरुवात करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

मुंबईतील टेस्लाचे सेंटर केवळ एक्सपीरियन्स सेंटर न राहता, डिलिव्हरी लोकेशन, लॉजिस्टिक सेंटर आणि सर्विसिंग युनिट देखील येथे सुरु करण्यात आले आहे. टेस्लाच्या कार्सचे बुकिंगही याठिकाणी सुरु झाले आहे. टेस्लाचे जगप्रसिद्ध मॉडेल “Model Y” आज भारतात लाँच करण्यात आले असून, या कारला १५ मिनिटांत चार्ज करता येते आणि ती एकदा चार्ज केल्यानंतर ६०० किमी धावू शकते. ही कार शून्य प्रदूषण करणारी असून, तिचे सेफ्टी फीचर्स जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानले जातात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहनासाठी अत्यंत डायनॅमिक पॉलिसी राबवली आहे. यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, कर सवलती व मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योगात देशात आघाडीवर असेल. तसेच मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून, मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन उभारली जात आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Total Visitor Counter

2455444
Share This Article