GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: मुंबई गोवा महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक खोळंबली

चिपळूण: चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर आज, मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शालोम हॉटेलसमोर एक ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तो भाग ‘ब्लॅक स्पॉट’ बनत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. कालच याच मार्गावर पुलाचे काम सुरू असताना लोखंडी सळी कोसळण्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आज हा अपघात घडल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “शहरात प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर उतरावे लागते,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, उशिरापर्यंत ट्रक हटवण्याचे काम सुरू होते. शहरवासीयांनी या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article