रत्नागिरी: महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांनी क्रांती घडवून आणणारे युवा शेतकरी, ‘फणसकिंग’ म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई, यांना आज ‘युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२५’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या कार्याला आणखी एक मोठी दाद मिळाली आहे.
हा सोहळा डॉ. सुधीरजी तांबे साहेब आणि सत्यजितदादा तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळ या व्यासपीठावरून आयोजित करण्यात आला होता. आजचा हा पुरस्कार देसाई यांच्यासाठी कायम स्मरणात राहील असा होता, कारण राज्याचे माजी महसूल मंत्री आणि कृषी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि युवा आयकॉन तथा राज्यमंत्री इंद्रनीलदादा नाईक यांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दोन्ही दिग्गजांच्या उपस्थितीने सोहळ्याची शान आणखी वाढली.
मिथिलेश देसाई हे गेल्या अनेक वर्षांपासून फणस लागवड आणि त्याच्या प्रक्रिया उद्योगात अग्रेसर आहेत. त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत फणसाच्या विविध जातींची लागवड केली, तसेच फणसापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून शेतकऱ्यांसाठी एक नवा मार्ग खुला केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे फणसाला एक वेगळी ओळख मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन फणस लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. देसाई यांनी केवळ उत्पादन वाढवले नाही तर, फणसाच्या विपणनासाठी आणि नवीन बाजारपेठा मिळवण्यासाठीही मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या ‘फणसकिंग’ या ब्रँडने महाराष्ट्राबाहेरही आपली ओळख निर्माण केली आहे.
या सन्मानामुळे मिथिलेश देसाई यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून, ते राज्यातील इतर युवा शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणास्रोत ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.