संगमेश्वर पोलिसांचे होतेय नागरिकांतून कौतुक
संगमेश्वर/ दिनेश आंब्रे : जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषतः संगमेश्वर खाडीपट्ट्यात आज पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते, ज्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. मात्र, अशा कठीण प्रसंगी संगमेश्वर पोलिसांनी देवदूतासारखी धाव घेऊन अनेक लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचे नागरिकांकडून प्रचंड कौतुक होत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, डीवायएसपी जयश्री गायकवाड,संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. मुसळधार पाऊस आणि पुराच्या लोंढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. धामणी येथील सनराईज हॉटेलजवळील पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.
या बचावकार्यात पोलीस निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस अंमलदार सचिन कामेरकर, विनय मनोवल, सतीश कोलगे, गिरीजाप्पा लोखंडे, आणि उत्तम साळवे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. मनुष्यहानी होऊ नये यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
केवळ बचावकार्यच नव्हे, तर ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी लोकांना जनजागृती करण्याचे कामही पोलिसांनी केले. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासंदर्भात मार्गदर्शन करून संभाव्य धोका टाळण्यास मदत केली.
संगमेश्वर पोलिसांच्या या समयसूचकता आणि धाडसी कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्यांनी आपल्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत पोलिसांनी बजावलेली ही भूमिका निश्चितच कौतुकास्पद असून, नागरिकांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.