दापोली: लाडघर येथे इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या ५१ वर्षीय इसमाचा इलेक्ट्रिक खांबावर चढत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाडघर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्नेहल सुभाष भोळे (रा. लाडघर, पार्थादेवी वाडी ता. दापोली जि. रत्नागिरी) असं या मृत्यू झालेल्या इसमाचं नाव आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल सुभाष भोळे हे गाव परिसरात विजेच्या खांबांवरत पथदिवे बदलण्याचे काम करायचे. लाडघर येथे लाईट बदलण्यासाठी ते शिडी घेऊन विजेच्या खांबावर चढले होते. यावेळी ते विजेच्या खांबाला लावलेल्या शिडीच्या दोन तीन पायऱ्या चढले आणि अचानक खाली कोसळले. बाहेर मोठा आवाज झाला म्हणून विजेच्या खांबाजवळ असलेल्या घरातील माणसांना आवाज आल्याने पाहण्यासाठी माणसं बाहेर आली. मात्र, स्नेहल भोळे हे विजेच्या खांबावरून खाली पडले होते. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. स्नेहल भोळे हे मूळचे रत्नागिरी जाकादेवी येथील होते. लाडघर येथे त्यांचे नातेवाईक असल्याने त्यांनी येथे घर बांधलं आहे.
सुरुवातीला महावितरणाच्या विजेच्या खांबावर शॉक लागून मृत्यू झाल्याचा संशय होता. मात्र वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. विजेच्या खांबावर चढले असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. स्नेहल भोळे यांचं कुटुंब मुंबई येथे आहे. लाडघर येथे ते आपल्या घरी एकटेच वास्तव्यास होते. मदतशील व्यक्तिमत्व म्हणून ते परिसरात ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने लाडघर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.
दापोली : इलेक्ट्रिक खांबावर चढताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
