चिपळूण : पर्यावरण रक्षणाच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने चिपळूण शहर आणि परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे संचालक भाऊ काटदरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरमहा रास दहा टन प्लास्टिकचा पुरुवापर केला जात असून, त्यामुळे शहराची स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनात मोठे योगदान मिळत आहे, अशी भावना पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी व्यक्त केली.
जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्तीदिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी भोसले यांनी खेर्डी एमआयडीसी येथील सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या प्लास्टिक संकलन आणि पुनर्वापर केंद्राला भेट दिली. त्यांनी या केंद्रातील प्रक्रियांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी आरोग्य निरीक्षक सुजित जाधवही त्यांच्यासोबत उपस्थित होते. संचालक भाऊ काटदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७०० नागरिक या उपक्रमात सहभागी झाले असून, नागरिकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर संदेश पाठवल्यानंतर कर्मचारी घरोघरी जाऊन प्लास्टिक संकलित करत आहेत. जमा झालेल्या प्लास्टिकचे आठ प्रकारांमध्ये काटेकोर वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर त्याचा पुनर्वापर केला जातो. वापरलेले प्लास्टिक केवळ साठवून ठेवले जात नाही तर पर्स, लॅपटॉप बॅग यांसारख्या उपयुक्त वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरण्यात येते. त्यासह थर्माकोलचाही पुनर्वापर या केंद्रात करण्यात येतो.
पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून दहा लोकांना रोजगाराची संधीही प्राप्त झाली आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र आणखी विस्तारण्यासाठी लवकरच प्लास्टिकपासून दोऱ्या तयार करणारे यंत्र आणण्यात येणार असून, त्यामुळे पुनर्वापर प्रक्रियेत नव्या उत्पादनांची भर पडणार आहे.