रत्नागिरी: रत्नागिरी शहराच्या मध्यभागी असलेल्या श्रीराम आळी येथील श्रीराम मंदिरात सोमवारी पहाटे ७.३० वाजण्याच्या सुमारास चोरीची गंभीर घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरातील सीतादेवीच्या मूर्तीला घातलेले ₹ १,५५,०००/- रुपये किमतीचे मौल्यवान दागिने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले आहेत. दिनांक २९/०९/२०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सौभाग्यनगर, नाचणे येथील रहिवासी विजय रामचंद्र देसाई (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.
मंदिरात चोरी झाल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये प्रामुख्याने ₹ १,५०,०००/- रुपये किमतीचे सुमारे २७.२४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ₹ ५,०००/- किमतीचा एक ग्रॅम सोने वापरून तयार केलेला तीन पदरी हार यांचा समावेश आहे. असा एकूण ₹ १,५५,०००/- किमतीचा ऐवज एका अनोळखी इसमाने चोरून नेला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका अनोळखी आरोपीविरुद्ध भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा २०२३, कलम ३०५ (क) नुसार गुन्हा (गु.आर.नं. ३८५/२०२५) नोंदवण्यात आला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रमुख मंदिरात चोरी झाल्यामुळे नागरिक आणि मंदिर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून चोरट्याला अटक करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.