GRAMIN SEARCH BANNER

नाटे सागरी पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई: अवघ्या १२ तासांत शिसे चोरी उघडकीस, ₹१.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

Gramin Varta
499 Views

जैतापूर/ राजन लाड  : सागरी पोलीस ठाणे नाटे यांनी पुन्हा एकदा आपली दक्षता आणि तपासकौशल्य सिद्ध करत अवघ्या १२ तासांच्या आत मच्छिमारी जाळ्यातील शिसे चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी तब्बल ₹१,४७,२००/- किमतीचे ४६० किलो वजनाचे शिसे हस्तगत केले असून, या चोरीत सहभागी असलेले दोन संशयित आरोपी तत्काळ ताब्यात घेतले आहेत. या जलद व प्रभावी कारवाईमुळे किनारी भागात अलीकडे वाढलेल्या चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. मौजे कातळी सडा, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे ही घटना घडली होती. फिर्यादी नासिर इसहाक मजगावकर (वय ४७, रा. कातळी) यांनी तक्रार दिली की, चंद्रशेखर रजनिकांत कुश्ये यांच्या मालकीचे पर्सनेट मच्छिमारी जाळे दुरुस्तीसाठी आणून ठेवले होते. दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी तपासणी केली असता जाळ्यातील सुमारे ६४० किलो वजनाचे शिसे चोरीस गेल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे गुन्हा रजि. क्र. ७४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. वाघ यांनी क्राईम ब्रँच रत्नागिरी शाखेत काम करताना मिळवलेला गुन्हेगारी तपासाचा अनुभव व तांत्रिक माहितीचा सखोल वापर या प्रकरणात प्रभावीपणे केला.

केवळ १२ तासांच्या तपासानंतर पोलिसांनी मुबिन अब्दुल सत्तार सोलकर (वय ३०, रा. धावुलवल्ली) आणि समिर कुदबुद्दिन सोलकर (रा. कातळी) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली, त्यानंतर त्यांच्या ताब्यातून ₹१,४७,२००/- किमतीचे (४६० किलो वजनाचे) पर्सनेट मच्छिमारी जाळ्याचे शिसे जप्त करण्यात आले. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाडे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, तसेच पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे, पो.कॉ. पाटील, पो.कॉ. जाधव, पो.कॉ. कुसाळे व पो.कॉ. बांदकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे हे करीत आहेत. सागरी पोलिसांच्या या जलद कारवाईचे मच्छिमार व नागरिकांनी मनापासून कौतुक केले असून, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत झाल्यामुळे मच्छिमार समुदायात मोठा दिलासा पसरला आहे.

Total Visitor Counter

2645819
Share This Article