GRAMIN SEARCH BANNER

रायगडमध्ये कर्जाची उचल न परतल्याचा बदला; बाळंतिणींसह सात जणांना पिकअपमध्ये बसवून पळवले

Gramin Varta
217 Views

रायगड: माणगाव आदिवासी वाडीतील अत्यंत गरीब कातकरी कुटुंबावर आलेल्या संकटाची थरारक कहाणी समोर आली असून, आदिवासी समाजाच्या असहाय्यतेचे करुण वास्तव पुन्हा एकदा उजेडात आले आहे.

नेरळ पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, दिनांक 19 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दोन ओल्या बाळंतीण महिलांना आणि पाच निष्पाप मुलींना जबरदस्तीने पिकअपमध्ये बसवून वीटभट्टीवर कामाला नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

फिर्यादी दर्शन विजय मिरकुटे (23) हा रोजंदारीवर मजुरी करणारा युवक. पत्नी प्रसूत असल्याने काही दिवस कामावर येता येणार नसल्याची माहिती त्याने काम देणाऱ्या आरोपींना दिली होती. मात्र, गरीब मजुराचे शब्द क्षणभरही न ऐकता आरोपी समीर नजे आणि अब्दुल्ला नजे यांनी पूर्वी घेतलेल्या ₹27,500 उचल रकमेचा बहाणा करून फिर्यादीच्या घरात धडक मारली.

घरात त्या क्षणी फिर्यादी अनुपस्थित… दोन बाळंतीण महिला अंगावर बाळं घेऊन तर मुली घाबरलेल्या अवस्थेत. अशा वेळी आरोपींनी कोणतीही दया न दाखवता महिलांना ओढत, मुलांना रडवित, धमकावत पिकअपमध्ये बसवले आणि वीटभट्टीकडे घेऊन गेले. “पैसे परत द्या; मगच तुमच्या बायका-मुलांना सोडू,” अशी निर्घृण धमकी त्यांनी दिली, सदर गुन्हा नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 215/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 146, 351(2)(3)(5) तसेच अधिनियम 1976 चे कलम 17 अंतर्गत नोंदविण्यात आला असे फिर्यादीने तक्रारीत काल २५ नोव्हेंबर रोजी रात्री नमूद केले आहे.

फिर्यादीचे आई-वडील उचल रक्कम परत करण्यासाठी गेले असता, आरोपींनी त्यांनाही हिणवून महिलांना परत पाठवण्यास सक्त नकार दिला. या गंभीर प्रकरणाचा तपास PSI प्राची पांगे करत आहेत. SDPO राहुल गायकवाड आणि स.पो.नि. शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, श्रमजीवी संघटनेने या प्रकरणावर ठाम भूमिका घेत नेरळ पोलीस ठाण्यात धडक देत आरोपींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी केली. विवेक भाऊ आणि बाळाराम भाऊ यांच्या नेतृत्वाखाली पंकज वाघ, मारुती वाघे, गोटीराम वाघे, मीनाताई पवार, वैभव पवार, गणेश डबरे, योगेश पवार, प्रकाश वाघ, रवींद्र जाधव, काळुराम पवार, मनोहर पवार, संतोष मुकणे, वसंत व नामदेव मिरकुटे यांनी सहभाग घेतला. या अमानुष घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असून आदिवासी कुटुंबांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3073097
Share This Article