GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर स्थानकावर समर स्पेशल गाड्यांना थांबा नाकारल्याने प्रवाशांमध्ये संताप

संगमेश्वर: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या थिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन या समर स्पेशल गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यात न आल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गाडी क्रमांक ०६०१३ आणि ०६०१४ या विशेष गाड्यांना माणगाव, रोहा आणि मडगाव यांसारख्या स्थानकांवर थांबे दिलेले असताना, संगमेश्वरसारख्या महत्त्वाच्या केंद्राला डावलण्यात आल्याने स्थानिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानक हे वार्षिक सुमारे सहा कोटी रुपयांचे उत्पन्न देणारे जिल्ह्यातील एक प्रमुख स्थानक असूनही, रेल्वे प्रशासनाकडून या स्थानकाच्या हक्काच्या थांब्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे, या समर स्पेशल गाड्यांमधील शेकडो आसने रिक्त असल्याचे निदर्शनास आले असून, संगमेश्वरला थांबा मिळाल्यास प्रवाशांची मोठी सोय होण्यासोबतच रेल्वेच्या महसुलातही मोठी भर पडणार आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर’ फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवून हा थांबा तात्काळ मंजूर करण्याची मागणी केली आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी गर्दी असतानाही अशा प्रकारे महत्त्वाच्या स्थानकाला थांब्यापासून वंचित ठेवणे हे अनाकलनीय मानले जात आहे. या मागणीला स्थानिक नागरिकांनीही मोठा पाठिंबा दिला असून, रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3474566
Share This Article