GRAMIN SEARCH BANNER

ग्रामीण भागातील गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देणार; प्रसिद्ध अभिनेत्री लतिका सावंत यांचे मंडणगड येथे प्रतिपादन

Gramin Varta
9 Views

मंडणगड: यशतेज फाउंडेशनच्या पुढाकारातून प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व लतिका सावंत यांनी २७ मार्च रोजी मंडणगड शहराला सदिच्छा भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. यशतेज फाउंडेशनच्या शहरातील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमास शहरातील नागरिक, विद्यार्थी, युवा वर्ग आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. दोन दशकांहून अधिक काळ अभिनय आणि लेखन क्षेत्रात सक्रिय असलेल्या लतिका सावंत यांनी ऐतिहासिक मालिकांमधील आपल्या प्रभावी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून, विशेषतः त्यांची ‘धाराऊ’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

या कार्यक्रमात संवाद साधताना लतिका सावंत यांनी मंडणगडमधील मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना मोठे कलाकार, लेखक आणि समाजनेते बनवण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः वंचित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात उंच भरारी घेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कथा, पटकथा आणि संवाद लेखनाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर आपली पकड असणाऱ्या सावंत यांनी यावेळी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करत प्रेरणा दिली. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने यशतेज फाउंडेशनच्या वतीने आगामी काळात सर्वसामान्यांसाठी दर्जेदार वृद्धाश्रम आणि पर्यावरण संवर्धनासाठी भव्य रोपवाटिका अशा दोन महत्त्वाकांक्षी सामाजिक प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या उपक्रमामुळे मंडणगड परिसरात उत्साहाचे आणि आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वच स्तरांतून या भेटीचे कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3227275
Share This Article