GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: तळवडे गावातील संकेत नेमण याची जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात निवड

Gramin Varta
183 Views

पाचल / अंकुश पोटले: राजापूर तालुक्यातील तळवडे मोरेवाडी येथील सुपुत्र संकेत चंद्रकांत नेमण याने आपल्या अफाट जिद्दीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मूळचा तळवडे येथील रहिवासी असलेला संकेत सध्या आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईतील अंधेरी येथे वास्तव्यास आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जोगेश्वरी पूर्व येथील बांधिवली विद्यामंदिर येथे पूर्ण झाले. साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येत पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत आपला प्रवास सुरू ठेवला होता.

नियमित अभ्यास, कठोर शारीरिक मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर संकेतने पोलीस भरती प्रक्रियेत हे घवघवीत यश संपादन केले आहे. मुंबईतील मरोळ येथे पोलीस दलात पदार्पण झाल्यानंतर नुकताच जालना येथे त्याचा प्रशिक्षण पूर्णत्वाचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. एका सर्वसामान्य तरुणाने आपल्या मेहनतीने मिळवलेले हे यश मुंबईपासून तळवडे गावापर्यंतच्या अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्याच्या या निवडीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संकेतने मिळवलेल्या या यशाबद्दल मोरेवाडी ग्रामविकास मंडळ, गावातील व परिसरातील ग्रामस्थ, त्याचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षक आणि आई-वडिलांकडून त्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील एका तरुणाने पोलीस दलात भरती होऊन देशसेवेची संधी मिळवल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Total Visitor Counter

3379162
Share This Article