GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या वेदिका मेस्त्रीची कला क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर मोठी भरारी; सुवर्णपदकावर कोरले नाव

Gramin Varta
149 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळील शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या, महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाची तृतीय वर्ष बीसीएची विद्यार्थिनी वेदिका मेस्त्री हिने आपल्या कलेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. चेन्नई (तमिळनाडू) येथे आयोजित करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या (एआययू) ३९ व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६’ मध्ये तिने मूक अभिनय या प्रकारात ‘बटरफ्लाय स्टँड’ या आपल्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. वेदिकाचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असून तिच्या या यशाने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वेदिकाने यापूर्वी एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत आयोजित युवा महोत्सवात महाविद्यालय स्तरावर मूक अभिनय, स्किट आणि एकांकिका या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून विभागीय आणि अंतिम फेरीत यश मिळविले होते. तिच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिची एसएनडीटी विद्यापीठाच्या संघात झोनल स्तरासाठी निवड झाली होती. झोनल स्पर्धेतही तिने स्किट, नृत्य आणि एकांकिका अशा विविध कलाप्रकारांत सहभाग नोंदवून आपली छाप पाडली होती. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि रत्नागिरी प्रकल्पप्रमुख रवींद्र देव, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रतिभा लोंढे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3391902
Share This Article