देवरुख (प्रतिनिधी) – महिलांच्या आरोग्यसेवेला प्राधान्य देत देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात ‘हिरकणी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या विशेष कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या महिलांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली. त्यांनी कर्मचारी वर्गाशी संवाद साधून त्यांच्या कामाची माहिती घेतली. तसेच, रुग्णांची विचारपूस करत त्यांना मिळणाऱ्या उपचारांविषयी जाणून घेतले. आमदार निकम यांनी ‘हिरकणी कक्षा’च्या उद्घाटनानंतर बोलताना सांगितले की, “गावातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना वेळेत योग्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ‘हिरकणी कक्ष’ सुरू झाल्याचा मला विशेष आनंद आहे.”
या कक्षाची निर्मिती महिलांना प्रसूतीदरम्यान आणि त्यानंतर योग्य काळजी घेता यावी या उद्देशाने करण्यात आली आहे. ज्यामुळे माता आणि बालकांचे आरोग्य अधिक सुरक्षित राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी डॉक्टर माने, हनीफशेठ हरचिरकर, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळककर, नितीन भोसले यांच्यासह रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनीच या नव्या उपक्रमाचे स्वागत केले असून, यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.