घरमालकिणीला लाखोंचा गंडा
खेड: खेड तालुक्यातील खवटी, सतीचा कोंड येथे भाड्याने राहणाऱ्या एका दाम्पत्याने घरमालकिणीच्या घरातून तब्बल दोन लाख चार हजार सातशे रुपयांचे सोन्याचे दागिने आणि घरगुती वस्तू चोरून पलायन केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. खवटी येथील रहिवासी अनिता दिपक शिंदे (वय ४३) यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक १५/०९/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ते १८/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. आरोपी भाडेकरू आशिष तुळशीराम दोडके आणि स्वरुपा आशिष दोडके (दोघेही रा. सतीचा कोंड) हे फिर्यादी यांच्या घरात भाड्याने राहत होते.
याच दरम्यान त्यांनी लबाडीच्या इराद्याने, घरमालकिणीच्या संमतीशिवाय घरातील मौल्यवान ऐवज चोरून नेला. या चोरीस गेलेल्या मालामध्ये ₹ १,२०,०००/- किमतीचा सुमारे १५ ग्रॅम ८८० मिलि वजनाचा एक सोन्याचा लक्ष्मीहार, ₹ ४०,०००/- किमतीची सुमारे ०५ ग्रॅम ३२० मिलि वजनाची एक सोन्याची चैन, ₹ ४०,०००/- किमतीची सुमारे ०५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, तसेच ₹ ३,५००/- किमतीची भांडी, ₹ १,२००/- किमतीचा एचपी कंपनीचा गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी यांचा समावेश आहे. एकूण २,०४,७००/- रुपयांचा ऐवज आरोपींनी लंपास केला आहे. दि. २९/०९/२०२५ रोजी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायदा २०२३ च्या परिच्छेद ३०५(अ) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा (गु.आर.क्र. ३०१/२०२५) दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार झालेल्या दाम्पत्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे भाडेकरूंची योग्य माहिती न घेता घर देणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.