कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणार्या टेम्पोतील सिलिंडरमधून अचानक ऑक्सिजनची गळती सुरू झाली. सोमवारी रात्री 9.15 वा.च्या सुमारास हा प्रकार घडला.
सुदैवाने, एका जागरुक वाहनचालकाने ही बाब टेम्पोचालक धीरज गुप्ता यांच्या निदर्शनास आणून देताच त्याने तत्काळ टेम्पो थांबविला. पुढच्या काही मिनिटांत घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
टेम्पो चालक धीरज गुप्ता हे ऑक्सिजन भरलेले सिलिंडर घेऊन गोवा ते मुंबई जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ- पिंगुळी गावाजवळून जात असताना अचानक टेम्पोमधील एका सिलिंडरमधून गॅस गळती सुरू झाली. ही गळती कुडाळ भंगसाळ नदीपर्यंत सुरू होती. दरम्यान एका वाहनचालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने टेम्पोचालक धीरज गुप्ता यांना याची माहिती दिली. आपल्या टेम्पातील सिलिंडरमधून गॅसची गळती होत असल्याचे लक्षात येताच श्री. गुप्ता यांनी तातडीने टेम्पो महामार्गाच्या बाजूला थांबवला.
यावेळी टेम्पोच्या मागून मोठ्या प्रमाणात धूरसद़ृश वायू बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी केली असता, टेम्पोमध्ये ऑक्सिजनने भरलेले सिलिंडर असल्याचे आणि त्यापैकी एक सिलिंडर लिकेज असल्याचे दिसून आले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली आणि तो सिलिंडर निकामी केल्याचे सांगण्यात आले.
मुंबई – गोवा महामार्गावर चालत्या टेम्पोतून गॅस गळती
