गलथान कारभारामुळे नागरिकांना त्रास, शासनाची फसवणुक करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजापुर: शहरातील कोदवली परिसरात पाण्याची समस्या दूर करण्यासाठी नव्या बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी, हे काम ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत असून प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ही काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्वप्नील सुभाष खैर यांनी केली आहे.
राजापुर नगर परिषदेच्या वतीने मे. विनोद कन्स्ट्रक्शन, राजापूर या ठेकेदाराला 10 डिसेंबर 2020 रोजी बंधाऱ्याचे काम देण्यात आले होते. मात्र काम अपूर्ण असल्यामुळे 29/6/2021 रोजी वाढीव काम करण्यासाठी वर्षभराचा वेळ वाढवून देण्यात आला होता. या कामाची कालमर्यादा दीड वर्षासाठी होती. तरीही काम पूर्ण झालेले नाही. मागील 3 वर्षे काम पूर्णपणे थांबले आहे. ठेकेदाराकडे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा अभाव असल्याने कामाला गती मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, शेतीचे नुकसान होणे तसेच नागरिकांना दैनंदिन जीवनात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. स्वप्नील खैर यांनी ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. ठेकेदाराने काम वेळेत करणे आवश्यक होते. शासनाने घालून दिलेल्या कामाचे ठेकेदाराने वेळोवेळी उल्लंघन केले आहे. ठरलेल्या वेळेत काम न पूर्ण करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी किंवा काळ्या यादीत टाकावे. शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी खैर यांनी मागणी केली आहे.
नागरिकांच्या हितासाठी याप्रकरणी तात्काळ निर्णय घेऊन काम पूर्ण करावे, अन्यथा लोकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
याबाबतची ऑनलाइन तक्रार मुख्याधिकारी राजापूर, जिल्हाधिकारी राजापूर, जिल्हा जल संधारण अधिकारी रत्नागिरी, कोकण विभागीय आयुक्त, प्रधान नगर विकास विभाग, मृदा जलसंधारण मंत्री संजय राठोड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राजापुरात कोदवली धरणाच्या बंधाऱ्याचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
