GRAMIN SEARCH BANNER

अरुण गवळी तब्ब्ल १८ वर्षांनंतर तुरुंगाबाहेर

Gramin Varta
87 Views

नागपूर : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर अरुण गवळीला 18 वर्षांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

मात्र सर्वाेच्च न्यायालयाने आठवड्याभरापूर्वी गँगस्टर अरुण गवळीला जामीन मंजूर केला होता. यानंतर आज (3 सप्टेंबर) अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळीला तुरुगांच्या मागच्या गेटने बाहेर काढले.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी याला हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्कांतर्गत 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच्यासह अन्य दहा आरोपींनासुद्धा या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर अरुण गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. धक्कादायक म्हणजे गँगस्टर अरुण गवळी याने कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती.

अरुण गवळीच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एमएम संद्रेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठात पार पडली होती. त्यावेळी अरुण गवळीची बाजू अ‍ॅड. हडकर आणि अ‍ॅड. मीर नगमन अली यांनी मांडली. त्यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, अरुण गवळीची अटक नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाशी विसंगत आणि अन्यायकारक आहे. तसेच, त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. तर सरकारी वकिलांनी अरुण गवळी यांच्या वकिलांच्या युक्तीवादाला जोरदार विरोध केला. परंतु दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अरुण गवळीला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये निश्चित करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत अरुण गवळीला ट्रायल कोर्टाने घालून दिलेल्या अटी-शर्तींवर आधारित जामीन देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. अरुण गवळीची सुटका गुप्त ठेवण्यासाठी नागपूर कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. त्यांनी अरुण गवळीला मीडियापासून लपवत कारागृहामागील गेटमधून गुपचूप बाहेर काढले. यानंतर नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले. त्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचं सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीबरोबर प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या हस्तकांमार्फत जामसंडेकर यांची सुपारी दिली होती. गँगस्टर अरुण गवळीने प्रताप गोडसेकडे ही सुपारी सोपवली. या प्रकरणी नाव न येण्यासाठी नवे शूटर्स शोधण्यात आले. गोडसेने या कामगिरीसाठी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली होती. यासाठी दोघांनाही प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे निश्चित करून प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अ‍ॅडव्हान्स सुद्धा देण्यात आले होते. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वाल सोबत जवळपास 15 दिवस जामसंडेवर पाळत ठेवली. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Total Visitor Counter

2650447
Share This Article