राजापूर: मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील विविध भागांत पुराचे पाणी शिरले आहे. जवाहरचौक, खडपेवाडी परिसर, मासळी मार्केट परिसर, वरचीपेठ, तसेच समर्थ नगर (भटाळी) आणि कोंडेतड ब्रीज परिसरात पाणी पातळी वाढली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नगर परिषदेने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनीही स्वतःच्या दुकानांतील सामान सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. प्रशासनाच्या या जलद कारवाईमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही, तसेच कोणत्याही रहिवासी किंवा दुकानदाराचे नुकसान झालेले नाही.
सद्यस्थितीत नगर परिषदेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्यासाठी दर दहा मिनिटांनी नियंत्रण कक्षातून स्पीकरद्वारे सूचना दिल्या जात आहेत, तसेच सायरन वाजवून धोक्याची सूचना दिली जात आहे.
या परिस्थितीत प्रशासनाचे योग्य नियोजन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.