GRAMIN SEARCH BANNER

इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात ‘१०९८’ टोल फ्री क्रमांक, काय आहे प्रकार? जाणून घ्या.

मुंबई: राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बालहिताच्या दृष्टीने ‘१०९८’ हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक समाविष्ट करून, महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुलांमध्ये लहान वयातच स्वतःच्या हक्कांविषयी जागरूकता, संकटात मदत घेण्याचा आत्मविश्वास, आणि सुरक्षेची भावना रुजवण्याचा प्रयत्न होणार आहे.

या क्रमांकाचा उल्लेख पूर्वी इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात होता. मात्र आता तो इयत्ता पहिलीपासूनच शिकवण्यात येणार आहे. लहान वयातच मुलांना सामाजिक सुरक्षा यंत्रणांबद्दलची माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे.

‘१०९८’ म्हणजे काय?

‘१०९८’ हा बालहक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘चाईल्डलाइन इंडिया फाउंडेशन’ या संस्थेचा मोफत टोल फ्री क्रमांक आहे. हा क्रमांक २४x७ (संपूर्ण दिवस व रात्र) कार्यरत असतो, आणि भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करतो. हा क्रमांक १८ वर्षांखालील सर्व बालक आणि बालिकांसाठी उपलब्ध आहे. बालविवाह, बालमजुरी, शारीरिक, मानसिक अत्याचार, उपेक्षा, विस्थापन, बेपत्ता होणे किंवा इतर संकटग्रस्त स्थितीत असलेल्या कोणत्याही मुलासाठी या क्रमांकावर त्वरित मदत मिळू शकते.

बालकांमध्ये आत्मविश्वास व जनजागृतीसाठी हा प्रभावी टप्पा मानला जात आहे. या क्रमांकाचा अभ्यासक्रमात समावेश करून शालेय वयातच मुलांना “अत्याचार सहन करणे नाही, तर मदतीसाठी आवाज उठवणे” हे शिकवण्याचा अत्यंत सकारात्मक प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. मात्र शिक्षक व पालकांनीही या क्रमांकाचे महत्त्व मुलांना समजावून देणे आवश्यक आहे. या माध्यमातून सामाजिक सुरक्षिततेसाठी शिक्षणातून पुढाकार घेण्यात येत आहे. शालेय वयातच मुलांमध्ये कायद्याचा आधार, आत्मभान आणि सामाजिक सुरक्षा यांचा परिचय करून देणे, हा १०९८ क्रमांक अभ्यासक्रमात आणण्याचा उद्देश असल्याचे उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी सांगितले. शिक्षण हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संरक्षणासाठी वापरण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ते म्हणाले.

Total Visitor

0217691
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *