GRAMIN SEARCH BANNER

२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच

मुंबई – विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की २६.३४ लाख बहिणींचे मानधन हे छाननीचे काम पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आले आहे.

याचा अर्थ या सर्व बहिणी कायमस्वरुपी अपात्र ठरलेल्या आहेत असे नाही. त्यांच्यापैकी छाननीअंती ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना नियमितपणे दरमहा दीड हजार रुपये मानधन दिले जाईल.

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी एक्सवर सांगितले, की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे २६.३४ लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. हे लाभार्थी सर्वच जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने या लाभार्थींची माहिती संबंधित जिल्हा यंत्रणांना छाननीसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरतात की नाही या बाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार योग्य ती कारवाई
छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थींचा लाभ यापुढेहीसुरू राहील.

या योजनेत २६.३४ लाख लाभार्थींचे मानधन रोखण्यात आले असले तरी २.२९ कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. त्यापोटी सरकार साडेतीन हजार कोटी रुपये महिन्याकाठी खर्च करीत आहे.

Total Visitor Counter

2475388
Share This Article