‘नरबळी’च्या संशयाने चिपळूण तालुक्यात खळबळ
चिपळूण: रामपूर-आवटेवाडी परिसरातील जंगलमय भागात सापडलेली छोटी हाडे मानवी आहेत की अन्य कुणाची है कोल्हापूर येथील प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. सदर हाडे कोल्हापूरला पाठवली जाणार आहेत. मात्र, याच हाडाच्या बाजूला घटनास्थळीच दोन अंगठ्या, चार एकत्र असलेले कृत्रिम दात सापडले असल्याने नरबळीची चर्चा सुरु झाली आहे.
याप्रकरणी आंबा बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी व स्थानिक अशा चार मजुरांची पोलिसांनी चौकशी केली असता महिनाभरापूर्वीच त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याचे स्पष्ट झाले. मात्र भितीपोटी त्यांनी याबाबतची माहिती कोणालीही सांगितली नाही. दरम्यान, पोलिसांनी सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मानवी वस्तीपासून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर हा जंगलमय परिसर आहे. त्या भागात आंबा बागा असून त्याठिकाणी स्थानिक व नेपाळी मजूर कार्यरत आहेत. या जंगलमय परिसरात जळालेल्या भागात छोटी हाडे शनिवारी सापडल्याने खळबळ उडाली. ही हाडे नेमकी कोणाची आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ती तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेकडे पाठवली जाणार आहेत. त्याचा अहवाल तातडीने मिळवण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने तपासणाला वेग येणार आहे. या हाडांजवळच दोन अंगठ्या, चार एकत्र असलेले कृत्रिम दात, एक पूर्ण जळलेल्या बॅगेचा तुकडा, लोखंडी साहित्य, छोटी चावी, लोखंडी स्क्रू असे साहित्यही आढळून आले आहे. त्यामुळे नरबळीची चर्चा अधिक सुरू झाली आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.
हाडे तीन ते चार महिन्यापूर्वीची?
ज्याठिकाणी ही हाडे सापडली जंगलात दोन अंगठ्या, कृत्रिम दात सापडले तेथील परिस्थिती पाहता ही हाडे तीन ते चार महिन्यापूर्वीची असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा भाग जाळला गेल्याने अन्य हाडे जळून खाक झाली असावीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आंबा बागेतील मजूरांची केली पोलिसांनी चौकशी
दरम्यान, या जंगलमय भागात आंबा बागा असल्याने त्याठिकाणी नेपाळी मजुरांचा वावर असतो. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबा बागेत काम करणारे एक स्थानिक तर तीन नेपाळी मजुरांची चौकशी पोलिसांनी केली आहे. महिनापूर्वी त्यांना ही हाडे निदर्शनास आली होती. मात्र भितीपोटी त्यांनी याची कल्पना कोणालाही दिली नाही. अखेर याची माहिती आंबा बाग प्रमुखांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
बुवाबाजीचीही घेतली जातेय माहिती
छोटी हाडे, दोन अंगठ्या, चार एकत्र असलेले कृत्रिम दात, छोटी चावी, लोखंडी स्कू, जळलेल्या बॅगेचा तुकडा आदी वस्तू आणि एकूणच साऱ्या परिस्थितीमागचे सत्य पुढे आणण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर रामपूर परिसरात कुठे बुवाबाजी चालते का याची गुप्त माहितीही पोलीस यंत्रणेकडून घेतली जात असल्याचे समजते.







