मकरंद सुर्वे / संगमेश्वर
असुर्डे (ता. चिपळूण) येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री स्वामी शंकरनाथ प्रतिष्ठान, असुर्डे येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून स्वामींच्या पादुकांवर दुग्धाभिषेकाने सुरुवात झाली. त्यानंतर महापूजा, महाआरती, अखंड नामस्मरण आणि महायज्ञ पार पडला. रात्रीही नामस्मरण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाच्या दिवशी सुमारे १२०० हून अधिक भक्त – महिला, पुरुष, आबालवृद्ध आणि लहान मुले – स्वामींच्या दर्शनासाठी उपस्थित होते. सर्व भक्तांनी स्वामींचा आशीर्वाद घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे स्वामी समर्थ श्री शंकरनाथ प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येतो. असुर्डे येथील हे स्थळ भक्तांच्या दृष्टीने एक जागृत देवस्थान मानले जाते. दर गुरुवारी येथे नामस्मरण व महाआरती केली जाते. यासाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर जिल्ह्याबाहेरूनही असंख्य भक्तगण येथे येत असतात.
जागृत देवस्थान श्री स्वामी शंकरनाथ प्रतिष्ठान, असुर्डे येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
