GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नगर परिषदेत ‘मंजूर-नामंजूर’चा खेळ? वादग्रस्त विषय पुन्हा अजेंड्यावर; मिलिंद कीर यांचा गंभीर आरोप

Gramin Varta
81 Views

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असून मंजुरी आणि नामंजुरीचा विचित्र खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला आहे. येत्या ३० मार्च २०२६ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर पुन्हा एकदा वादग्रस्त विषयांचा समावेश करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अजेंड्यावरील विषय क्रमांक ६४ अंतर्गत यापूर्वी वादग्रस्त ठरलेलेच मुद्दे पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. हे विषय ३० जानेवारी रोजी मंजूर करण्यात आले होते. मात्र, त्याविरोधात तक्रारी आल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी त्यांना स्थगिती देण्यात आली होती. असे असताना पुन्हा तेच विषय मंजुरीसाठी मांडले जाणे म्हणजे नियमांची सर्रास पायमल्ली असल्याचा आरोप कीर यांनी केला आहे.

यातील अधिक धक्कादायक बाब म्हणजे संबंधित कामे मंजुरीपूर्वीच पूर्ण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत जिओ-टॅग केलेले फोटो आणि व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ प्रशासकीय नियमांचे उल्लंघन नसून संभाव्य आर्थिक अनियमिततेचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही कीर यांनी सांगितले. जनतेच्या पैशांचा हिशोब मागण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार असून नियम वाकवून कामे करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे म्हटले.
दरम्यान, महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ मधील कलम ३०८ अंतर्गत हस्तक्षेप करून संबंधित वादग्रस्त विषयांना तात्काळ स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3379159
Share This Article