GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले ‘बसरा स्टार’ जहाज अखेर भंगारात, बंधारा बांधण्याचा मार्ग मोकळा

Gramin Varta
393 Views

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावरील खडकात तब्बल पाच वर्षे अडकून राहिलेले आणि ‘रीलस्टार’ म्हणून ओळखले जाणारे ‘बसरा स्टार’ हे मालवाहू जहाज अखेर भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातत्याने येणाऱ्या लाटांच्या माऱ्यामुळे या जहाजाचे दोन मोठे तुकडे झाले होते. आता कटिंगची कामे सुरू झाल्याने मिऱ्या किनाऱ्यावर रखडलेला महत्त्वाचा बंधारा प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने ३ जून २०२० रोजी हे जहाज भरकटले आणि मिऱ्या किनाऱ्यावरील खडकात अडकले. जहाज काढण्यासाठी शासकीय यंत्रणांनी अनेक प्रयत्न केले; मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. सुरुवातीला सुमारे ३५ कोटी रुपयांची किंमत असलेले हे जहाज खाऱ्या पाण्याच्या सततच्या माऱ्यामुळे आणि दीर्घकाळच्या दुर्लक्षामुळे पूर्णतः खराब झाले. त्यामुळे आता अवघ्या दोन कोटी रुपयांत ते भंगारात काढले जात आहे.

एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन ही कंपनी कस्टम व मेरीटाइम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून हे काम पाहत आहे. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क साधल्यानंतर ४० लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे जहाज अधिकृतरीत्या भंगारात काढण्यास परवानगी देण्यात आली.

जहाजाचे मोठे तुकडे झाल्याने सध्या ते कटिंग करून बाहेर काढले जात आहेत. जहाज अडकल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिऱ्या किनाऱ्यावरील बंधारा प्रकल्पाला आता गती मिळणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3378821
Share This Article