देवरुख नगरपंचायत निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी ‘गाव विकास समिती’ कोणत्या चिन्हावर लढणार? आज संध्याकाळी होणार फैसला!

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

युतीचा उमेदवार म्हणून आपच्या चिन्हा वरील व अपक्ष भरलेला  दोन्ही अर्ज वैध

देवरुख: देवरुख नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी गाव विकास समिती (गा.वि.स) आणि आम आदमी पार्टी  युतीकडून उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या दीक्षा खंडागळे यांच्या निवडणूक चिन्हाबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दीक्षा खंडागळे यांनी युतीचे उमेदवार म्हणून ‘आप’च्या चिन्हावर पहिला अर्ज, तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने आता गाव विकास समिती नेमका कोणता अर्ज मागे घेते आणि दीक्षा खंडागळे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतात, याकडे देवरुखवासीयांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही अर्ज वैध, चिन्हाचा तिढा कायम

गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी यांच्या युतीच्या वतीने दीक्षा खंडागळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. युतीच्या माध्यमातून त्यांनी आम आदमी पार्टीच्या चिन्हावर पहिला अर्ज भरला. मात्र, दुसऱ्या दिवशी गाव विकास समितीने खबरदारी म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून दुसरा अर्जही दाखल केला होता. अर्ज छाननीमध्ये दीक्षा खंडागळे यांचे हे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. यामुळे आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक ‘आप’च्या चिन्हावर लढायची की अपक्ष चिन्हावर, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

धाडसी निर्णय: ‘आप’ सोबत युती

अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी चिन्हासाठी खूप कमी (अवघा चार दिवसांचा) वेळ मिळत असल्याने, गाव विकास समितीने यावेळी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आम आदमी पार्टीसोबत युती करून आपला उमेदवार ‘आप’च्या चिन्हावर मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला, आणि तसा अर्जही दाखल केला होता. मात्र, अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आता अंतिम निर्णय समितीच्या हाती आहे.

आज सायंकाळी ‘कोअर कमिटी’ची बैठक

दीक्षा खंडागळे नेमक्या कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, याचा अंतिम फैसला आज  सायंकाळी होण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी गाव विकास समितीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत कोअर कमिटीतील सदस्य, ज्यात उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे, देवरुख निवडणूक प्रभारी डॉ. मंगेश कांगणे, आणि सरचिटणीस सुरेंद्र काबदुले यांचा समावेश आहे, ते अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

गाव विकास समितीकडून आज सायंकाळी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. कोणता अर्ज मागे घेतला जातो, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *