रत्नागिरी: सामाजिक बांधिलकी आणि परोपकाराची भावना जपत मजगांव येथील एहसास वेलफेअर ट्रस्टने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे कार्यरत असलेल्या ‘माहेर’ संस्थेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची अत्यंत गरज असल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. या संदेशाची तातडीने दखल घेत एहसास वेलफेअर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माहेर संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली आणि तेथील विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेतल्या.
निवळी येथील या संस्थेला भेट दिल्यानंतर ट्रस्टच्या सदस्यांनी माहेर संस्थेचे प्रकल्पप्रमुख सुनील कांबळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि इतर आवश्यक साहित्य लक्षात घेऊन एहसास वेल्फेअर ट्रस्टतर्फे संस्थेला २० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी एहसास वेल्फेअर ट्रस्टचे पदाधिकारी शुहेब नाकाडे, इम्तियाज नाकाडे, महमूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इबजी आणि मजगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक फैयाज मुकादम प्रामुख्याने उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमासाठी एहसास वेल्फेअर ट्रस्टचे तन्वीर काझी यांच्यासह रफिक काझी, मुझफ्फर मुकादम, रियाझ मुकादम, शाहिद सावकार, बासित इबजी, रफिक मुकादम, अल्ताफ सोलकर, आबीदअली काझी आणि बशीर पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मजगांव येथील एहसास वेल्फेअर ट्रस्ट ही संस्था नेहमीच गरजू व्यक्तींच्या आजारपणात धावून जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तत्पर असते. या मदतीमुळे माहेर संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना एक हक्काचा आणि भक्कम आधार मिळाला असून, ट्रस्टच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






