GRAMIN SEARCH BANNER

मिसिंग लिंकवर आठवड्याभरात २०४ वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई ; एक लाखांहून अधिक दंड वसूल

Gramin Varta
4 Views

मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल होऊन आठवडा होत आला तरी या मार्गाची भुरळ काही कमी होताना दिसत नाही. आठवड्याभरानंतरही वाहने मिसिंग लिंकवर थांबत आहेत, मिसिंग लिंकवर छायाचित्रे टिपण्यात येत आहेत, चित्रफिती आणि रिल्स बनविल्या जात आहे.आठवड्याभरात महामार्ग पोलिसांनी तब्बल २०४ वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई केली आणि वाहनचालकांकडून एक लाखांहून अधिक दंड वसूल केला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १३.३ किमी लांबीची मिसिंग लिंक बांधली. ही मिसिंग लिंक वाहतूक सेवेत दाखल झाल्याने अवघ्या काही मिनिटात खोपोली – कुसगाव, कुसगाव – खोपोली प्रवास करता येत आहे. प्रवासातील सहा किमी अंतर आणि ३० मिनिटांचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीही दूर झाली आहे. तर दुसरीकडे डोंगरातून, दऱ्याखोऱ्यांतून जाणारी मिसिंग लिंक वाहनचालक-प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

केबल स्टेड पूल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वाहनचालक-प्रवासी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली झाल्यापासून पुलावर गर्दी करत आहेत, वाहने थांबवून सेल्फी, छायाचित्रे टिपत आहेत, चित्रफिती, रिल्स तयार करीत आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांना, वाहनचालकांना रोखण्याचे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. महामार्ग पोलिसांनी १ मेपासूनच अशा वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू होऊन सात दिवस पूर्ण झाले तरी वाहने थांबवण्याच्या आणि रिल्स बनविण्याच्या प्रकारांना आळा बसलेला नाही. अजूनही मिसिंग लिंकवर वाहतूक नियमांचे उल्लंघन सुरूच आहे.

महामार्ग पोलिसांचे आवाहनआठवड्याभरात मोटार वाहन कायदा १२२ (सार्वजनिक ठिकाणी वाहन धोकादायक स्थितीत सोडून देणे, वाहनामुळे वाहतुकीला अडथळा, धोका किंवा गैरसोय निर्माण करणे) आणि ११९ (वाहतूक चिन्ह, सिग्नल आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणे) अंतर्गत २०४ वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई केल्याची माहिती तानाजी चिखले, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस यांनी दिली. कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बोगद्यात, पुलावर वाहने थांबविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, अशी वाहने थांबविणे वा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हा गुन्हा आहेच, पण स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे वाहनचालकांनी-प्रवाशांनी वाहतूक नियमांचे योग्य ते पालन करावे असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

Total Visitor Counter

3371098
Share This Article