GRAMIN SEARCH BANNER

सायबर सुरक्षा आणि डिजिटल न्यायवैद्यक क्षमता वाढवण्यासाठी यूआयडीएआयचा एनएफएसयूसोबत करार

Gramin Varta
3 Views

नवी दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू) यांनी डिजिटल न्यायवैद्यक, सायबर सुरक्षा आणि प्रगत तंत्रज्ञान संशोधन या क्षेत्रांमध्ये सुव्यवस्थित पंचवार्षिक सहयोगासाठी करार केला आहे.

हा सामंजस्य करार व्यापक सहयोगाची चौकट पुरवणारा असून भारताच्या डिजिटल ओळख प्रणालीचा आधारस्तंभ असलेल्या यूआयडीएआयच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सायबर लवचिकता अधिक बळकट करण्यासाठी या दोन प्रमुख राष्ट्रीय संस्थांना एकत्र आणतो.

यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक चंद्र वर्मा आणि एनएफएसयूच्या गुजरात कॅम्पसचे संचालक प्रा. (डॉ.) एस.ओ. जुनारे यांच्यात सामंजस्य कराराचे आदानप्रदान झाले. यावेळी यूआयडीएआयचे उपमहासंचालक अभिषेक कुमार सिंह आणि दोन्ही संस्थांमधले अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हा सहयोग सहा धोरणात्मक स्तंभांवर केंद्रित असेल. यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक विकास, माहिती सुरक्षा आणि प्रणालीची अखंडता, न्यायवैद्यक पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळेतील उत्कृष्टता, सायबर सुरक्षा उपक्रमांसाठी तांत्रिक साहाय्य यांचा समावेश आहे. तसेच एआय, ब्लॉकचेन, डीपफेक शोध आणि क्रिप्टोग्राफिक तंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील संयुक्त संशोधन असलेल्या तांत्रिक सल्ला आणि संशोधन, यात समाविष्ट आहे. त्याचसोबत एनएफएसयूच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी आणि संपर्क विस्ताराचा मार्ग पुरवण्यासह धोरणात्मक रोजगार व संपर्क विस्तारदेखील यात समाविष्ट आहे.

हे सहकार्य देशाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना बळ देणाऱ्या सुरक्षा, लवचिकता आणि न्यायवैद्यक क्षमता अधिक दृढ करण्याच्या दिशेने, तसेच देशाच्या डिजिटल ओळख प्रणालींसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक चंद्र वर्मा यांनी यावेळी सांगितले.

Total Visitor Counter

3362159
Share This Article