रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अंमलदारांच्या सेवेचा गौरव करत, ८ अंमलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित एका विशेष समारंभात पदोन्नती बहाल करण्यात आली. या पदोन्नती प्रक्रियेमध्ये एकूण ८ अंमलदारांचा समावेश असून, यामध्ये ४ अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी तर अन्य ४ अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर बढती देण्यात आली आहे. हा सोहळा रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मुख्तार शेख यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदोन्नती मिळालेल्या सर्व अंमलदारांना मान्यवरांच्या हस्ते फिती लावून सन्मानित करण्यात आले. पोलीस दलातील शिस्त आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा हा गौरव असल्याचे मानले जात असून, पदोन्नती प्राप्त सर्व अंमलदारांना त्यांच्या पुढील उज्वल कारकिर्दीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला अधिक बळकटी मिळणार आहे.






