GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद डंपर चालकाने संगमेश्वरमधील दोन निष्पाप तरुणांना चिरडले

Gramin Varta
591 Views

पेण: मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात ३० मे रोजी रात्री एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका डंपर चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना जागीच चिरडले.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या दुर्दैवी अपघातात संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या मुंबईतील विक्रोळी येथे वास्तव्यास असणाऱ्या आदित्य किशोर बल्लाळ वाडकर (वय २२) आणि यश मुकेश बल्लाळ (वय १२) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास खारपाडा गावातील पोलीस चौकीसमोर हा अपघात घडला. आरोपी डंपर चालक गौतम लक्ष्मण महतो (रा. बोकारो, झारखंड) याने दारूच्या नशेत, ओव्हरलोडेड गौण खनिज भरून डंपर अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला. या प्रकरणी मृत मुलाचे वडील मुकेश चंद्रकांत बल्लाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादर सागरी पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


या भीषण अपघातानंतर खारपाडा परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आणि मृत तरुणांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. महामार्गावर पेण उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच अशा प्रकारे अवैध आणि ओव्हरलोड गौण खनिजांची वाहतूक सुरू असते, असा थेट आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित महसूल व आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी आणि नागरिकांनी सुमारे दीड तास मृतदेह रस्त्यावरून उचलण्यास तीव्र नकार दिला, ज्यामुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच दादर सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले, त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून अपघाताचा पंचनामा करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे मूळ गाव संगमेश्वर आणि संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांचा आणि प्रशासकीय दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3474841
Share This Article