दापोली : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळसदृश्य परिस्थितीमुळे आंजर्ले-अडखळ खाडीत उभी असलेली ‘विघ्नहर्ता’ ही मासेमारी नौका दि. १८ दुपारी बुडाली.
या घटनेत नौका मालक किसन लक्ष्मण कुलाबकर (रा. हर्णे) यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.
‘विघ्नहर्ता’ (IND-MH-4-MM-482) ही नौका खाडीत उभी असताना पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. जोरदार प्रवाहामुळे नौका कलंडली, फुटली आणि आत पाणी शिरल्याने ती मासेमारी साठी योग्य राहिली नाही.
कुलाबकर यांची ही एकमेव नौका असून त्यावरच त्यांचे उपजीविकेचे साधन अवलंबून होते. “पारंपरिक मच्छीमार म्हणून कसाबसा हा उद्योग चालवत असताना अशा दुर्घटनेने आमचे भविष्यच प्रश्नचिन्हात आले आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या घटनेची पाहणी करून पंचनामा मत्स्यविभागाच्या परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी केला आहे.
दापोली: आंजर्ले-अडखळ खाडीत अतिवृष्टीमुळे बुडाली नौका
