‘काय समजलीव’ ग्रुपच्या माध्यमातून एकाच मंचावर आले जिल्ह्यातील कंटेंट क्रिएटर्स
कलाकारांना लागेल ती मदत करण्यासाठी तयार – मंत्री उदय सामंत
रत्नागिरी: हापूस आंबा आणि काजूसाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याने आता आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्याच्या निसर्गरम्य जागा, समृद्ध संस्कृती आणि कलात्मकतेला ‘रिल्स’च्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी ‘काय समजलीव’ या ग्रुपने एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. गावखडीचे सुपुत्र प्रणय सुहास पाटील यांनी या अभिनव उपक्रमाची संकल्पना मांडली आणि त्याला रत्नागिरीतील तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘विविधतेने नटलेला रत्नागिरी जिल्हा’ या खास थीमवर आधारित या स्पर्धेत, मंडणगडपासून राजापूरपर्यंतच्या जिल्ह्याचे विहंगम सौंदर्य आणि विविधता रिल्सच्या माध्यमातून जगासमोर आली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून १३५ हून अधिक तरुण क्रिएटर्सनी यात सहभाग घेतला. या रिल्सने रत्नागिरीतील छुपे सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, इथल्या मातीचा सुगंध आणि बोलीभाषा घराघरात पोहोचवली.

प्रणय पाटील यांच्या मते, उदय सामंत यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला. अंबर हॉल, टी.आर.पी., रत्नागिरी येथे झालेल्या या बक्षीस वितरण समारंभाला सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी रिल्सची ताकद अधोरेखित करणारा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “मी एकदा विमानतळावर अभिनेत्री करीना कपूर यांच्याकडे न पाहता पुढे गेलो, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तेव्हा मला कळले, कोणाकडे न बघितल्यामुळेसुद्धा माणूस या रिल्समुळे व्हायरल होऊ शकतो.”

या स्पर्धेत शुभम आंब्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांना २० हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. प्रथमेश पवार यांनी द्वितीय क्रमांक (१५ हजार रुपये व ट्रॉफी) आणि अमित कुबडे (कोकणी कार्टी) यांनी तृतीय क्रमांक (१० हजार रुपये व ट्रॉफी) मिळवला. या व्यतिरिक्त, प्रियांका बंडबे आणि निखिल सकपाळ यांना प्रत्येकी २ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. याशिवाय, प्रथमेश पवार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि छायांकन, रंजना मोरे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, श्रेयस माईन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, निखिल सकपाळ यांना सर्वोत्कृष्ट कथा आणि ओंकार गुरव यांना सर्वाधिक आवडलेली रील यासाठी गौरवण्यात आलं.

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. एकापेक्षा एक सरस रिल्समुळे विजेत्यांची निवड करणे परीक्षकांसाठी एक आव्हान होतं. श्री चंद्रशेखर मुळ्ये आणि श्री रोहन सावंत या अनुभवी परीक्षकांनी नवीन तंत्रज्ञान आणि बारकावे तपासत विजेते घोषित केले. ‘काय समजलीव’ ग्रुप आणि प्रणय पाटील यांचा हा प्रयत्न रत्नागिरीचा खरा चेहरा डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे.

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, बाबू म्हाप, कांचनताई नागवेकर, आणि सर्व प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्स उपस्थित होते. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिभावान युवा कलाकारांच्या अद्वितीय सादरीकरणाने मनाला स्पर्श केल्याचे सांगितले.

अल्पवेळात प्रभावी संवाद साधण्याचं सामर्थ्य या नव्या पिढीत आहे, हे पाहून अभिमान वाटल्याचे त्यांनी म्हटले. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये निवड झालेला सचिन काळे याचा विशेष उल्लेख करत, कोणत्याही वशिल्याशिवाय ग्रामीण भागातून मुंबईच्या रंगमंचापर्यंतची त्याची झेप ही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा, कोकणचं वारसातत्त्व, रत्नागिरीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा, आणि येथील तरुणाईची विद्वत्ता याचं जतन करत आपण जगासमोर एक आदर्श उभा करू शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ सोशल मीडियाच नाही, तर समाजप्रबोधन, शिक्षण, आणि संस्कृती जपण्याचा अनोखा संदेश देणारे रत्नागिरीतील हे आयोजन निश्चितच ‘रोल मॉडेल’ ठरेल, असे मत सामंत यांनी व्यक्त केले. आयोजकांचे, सहभागी स्पर्धकांचे आणि सर्व उपस्थितांचे आभार मानत, अशी स्पर्धा भविष्यात देशातील सर्वांत मोठी स्पर्धा होवो, हीच शुभेच्छा, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले. कलाकारांना लागेल ती मदत करण्यासाठी आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
