GRAMIN SEARCH BANNER

उक्षी घाटातून सुरक्षिततेच्या सूचना देणारे दहा ते बारा सूचना फलक चोरीला

सौ. सोनाली जोशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता दिली लेखी तक्रार

रत्नागिरी: उक्षी घाटातील रस्त्यावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेले दहा ते बारा महत्त्वाचे सूचना फलक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले हे फलक चोरीला गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेला आता मोठा धोका निर्माण झाला आहे. उक्षी गावच्या रहिवासी सोनाली जोशी यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असून, त्यांनी या प्रकरणी सार्वजनिक बांधकामकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या धोकादायक रस्त्यावर विविध सूचनांचे फलक बसवले होते. यात ‘तीव्र उतार’, ‘हॉर्न वाजवा’, ‘तीव्र वळण’ (N-turn) यांसारख्या महत्त्वाच्या सूचनांचा समावेश होता. सध्या या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ वाढली असून, हे फलक वाहनचालकांना धोक्याची पूर्वसूचना देत असल्याने त्यांचा मोठा फायदा होत होता. मात्र, आता हे सर्व फलक त्यांच्या जागेवरून उखडून काढलेले आढळले आहेत.

उक्षी गावच्या रहिवासी सोनाली जोशी यांनी संध्याकाळी फिरायला गेल्या असताना हे फलक त्यांच्या मूळ जागेवरून गायब झाल्याचे पाहिले. त्यांना अनेक ठिकाणी फक्त उखडलेल्या खांबांचे अवशेष दिसले. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन ओली असल्याने हे फलक काढणे सोपे झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे फलक चोरीला गेल्याने वाहनचालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

सोनाली जोशी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, या प्रकरणी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कळवले आहे. या प्रकारच्या चोरीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांना पकडावे आणि सार्वजनिक बांधकामने पुन्हा हे फलक बसवावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

Total Visitor Counter

2455624
Share This Article