रत्नागिरी : राज्याच्या आर्थिक अडचणींमुळे विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदींमुळे तिजोरीवर ताण येत आहे. त्यामुळे अनेक विभागांच्या विकासकामांच्या निधीत कपात करण्यात आली असून, त्याचा परिणाम आता थेट आरोग्य विभागावरही होऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या १०६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दरमहा ३५ लाख रुपयांचा वेतन खर्च असतानाही एप्रिलपासून हे अधिकारी पगारविना काम करत आहेत.
या आर्थिक तुटवड्याचा परिणाम केवळ पगारापुरता मर्यादित न राहता औषधसाठ्यावरही झाला आहे. श्वानदंशावरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा साठा संपत आला असून, केवळ १ हजार इंजेक्शन उरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. श्वानदंशाचे प्रमाण विशेषतः शहरी भागात जास्त असून, गेल्या वर्षभरात १८ हजार ३१७ नागरिकांना श्वानदंशाचा सामना करावा लागला. एक रुग्ण किमान ५ इंजेक्शन घेतो, असे गृहीत धरल्यास सध्याचा साठा अत्यंत अपुरा आहे.
आरोग्य विभागाने नवीन इंजेक्शनसाठी मागणी केली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील औषधसाठ्याचा तुटवडा आणि पगारापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांची वाढती चिंता यामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १०६ डॉक्टर 3 महिने पगारविना सेवा
