GRAMIN SEARCH BANNER

रायगडमध्ये ऐतिहासिक गडावर प्राचीन ‘मंकला’ खेळाचा शोध

रायगड: जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील अवचित गडावर खडकावर कोरलेला प्राचीन ‘मंकला’ खेळाचा नमुना सापडला आहे. खारापटी गावातील तरुणांनी गडभ्रमंतीदरम्यान हा अनोखा शोध लावला असून इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

गडावरील सपाट खडकावर दोन समांतर ओळींमध्ये प्रत्येकी सात खळगे आणि बाजूला दोन मोठे खळगे कोरलेली दिसत आहेत. या रचनेवरून हा खेळ ‘मंकला’ असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘मंकला’ हा जगातील सुमारे ३००० वर्षांपासून खेळला जाणारा प्राचीन बौद्धिक खेळ मानला जातो. खेळात बिया किंवा लहान दगडांचा वापर करून दोन खेळाडू ठराविक नियमांनुसार खेळतात. आफ्रिकेतील इथिओपिया येथे या खेळाची सुरुवात झाल्याचे मानले जाते आणि नंतर आशिया आणि भारतात विविध प्रकारांमध्ये हा खेळ लोकप्रिय झाला.

इतिहास अभ्यासकांच्या मते, अवचित गडावरील खडकावर कोरलेली ही रचना पाहता, गडावर वास्तव्यास असलेल्या सैनिक किंवा पहारेकऱ्यांनी विरंगुळ्यासाठी हा खेळ खेळला असावा. युद्धाच्या धावपळीबरोबरच गडावरील दैनंदिन जीवनात अशा खेळांना महत्त्वाचे स्थान होते, असा हा पुरावा आहे.

या शोधामध्ये खारापटी येथील जागृत तरुण पाटील, विशाल चोरगे, अतिश नाईक, ओमकार चोरगे आणि शुभम डोळस यांचा सहभाग होता. त्यांच्या उपक्रमामुळे अवचित गडाच्या ऐतिहासिक महत्त्वात भर पडली असून, दुर्गप्रेमींसाठी हा नवीन आकर्षण ठरणार आहे.

इतिहास अभ्यासक म्हणतात की, अशा कोरीव खुणा केवळ खेळाचे अवशेष नसून त्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक जीवनाची साक्ष देतात. त्यामुळे अशा वारशाचे संवर्धन करणे आणि गड-किल्ल्यांवरील लहानसहान पुराव्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Total Visitor Counter

3474864
Share This Article