दापोली : तालुक्यातील साखलोली येथे आज, बुधवार दि. २० मे रोजी दुपारच्या सुमारास एका इको गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून अपघातस्थळी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साखलोली येथील वळणाच्या रस्त्यावर हा अपघात घडला. इको गाडी आणि समोरून येणारी दुचाकी एकमेकांना अत्यंत वेगाने धडकल्याने हा अपघात झाला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि पादचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली व जखमींच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न केले.
नागरिकांनी प्रसंगावधान राखून गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या दोन्ही जखमींवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणेने घटनास्थळी भेट दिली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.







