देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाचा शाळेत शिकवत असतानाच अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजानन विनायक मोघे (वय ५४, रा. माळवाडी, देवळे) असे या मृत शिक्षकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गजानन मोघे हे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना तातडीने उपचारांसाठी देवळे येथील डॉ. पंकज मांगलेकर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय, पाली येथे हलवण्यास सांगितले.
मोलघे यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात २० जानेवारी रोजी रात्री उशिरा या प्रकरणाची अधिकृत नोंद झाली. एका कर्तव्यदक्ष शिक्षकाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.






