GRAMIN SEARCH BANNER

गाव विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न?गोताड वाडी फाटा येथील बस स्टॉपचे विद्रूपीकरण

देवरूख : गावाच्या विकासाचे ध्येय बाळगून गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेतून, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष मंगेश धावडे, राहुल यादव, डॉक्टर मंगेश कांगणे, सुरेंद्र काबदुले, ऍड.सुनील खंडागळे यांच्या सहकार्याने व नितीन गोताड यांच्या पाठपुराव्याने उभारलेल्या बस स्टॉपचे विद्रूपीकरण करून काही समाजकंटकांनी विकासाच्या कामांना विरोध दर्शवला आहे. आधी धावडेवाडी फाटा आणि आता गोताडवाडी फाटा, अशा दोन ठिकाणी हे कृत्य घडले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, गावच्या एकजुटीला धक्का लावणाऱ्या या विकृत मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गाव विकास समितीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतले आहेत. याच अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी एकाच वेळी गावात चार ठिकाणी सुसज्ज बस स्टॉप  उभारण्यात आले होते. गाव विकास समिती सोबत गावातील नागरिकांनी स्वतः हे बस स्टॉप उभारताना मेहनत घेतली होती.हे बस स्टॉप म्हणजे केवळ प्रवाशांसाठी निवारा नसून, गावाच्या एकोप्याचे आणि विकासाच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत. मात्र, अज्ञात समाजकंटकांनी या बस स्टॉपवरील फलक फाडून गाव विकास समितीच्या या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे असे ग्रामपंचायत सदस्य नितीन गोताड यांनी म्हटले आहे.

विकासाला विरोध की वैयक्तिक द्वेष?
गावात अशा पद्धतीने लोकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या मालमत्तेचे विद्रूपीकरण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे यामागे नेमका कोणता उद्देश आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही ग्रामस्थांच्या मते, हा निव्वळ गाव विकास समिती व गावाच्या विकासाला विरोध करण्याचा प्रयत्न आहे, तर काहींच्या मते, यामागे काही वैयक्तिक द्वेष असू शकतो. गाव विकास समितीने केलेल्या कामांना मिळालेले यश आणि जनतेचा पाठिंबा पाहून काही व्यक्तींमध्ये वैमनस्य निर्माण झाले असावे, असाही कयास बांधला जात आहे.

या विकृत कृत्यामुळे गावाच्या विकासाची गती थांबणार नाही, असा निर्धार गाव विकास समितीचे नितीन गोताड यांनी व्यक्त केला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल, जे कोणी हे प्रकार करत आहे त्यांना उत्तर दिले जाईल असेही समितीने स्पष्ट केले आहे. गावाच्या विकासासाठी एकत्र येणाऱ्या ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Total Visitor Counter

2456094
Share This Article