संगमेश्वर: समाजसेवा हा ध्यास बाळगून जनतेच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी सातत्याने झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले संदेश सुरेश जिमन आता प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरले आहेत. कसबा संगमेश्वर पंचायत समिती गणातून त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच २१ जानेवारी रोजी त्यांनी आपला अर्ज सादर केला. जनसेवेचा दृष्टिकोन समोर ठेवून आणि लोकांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संदेश जिमन यांनी आजवर कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा न ठेवता रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर मोठे काम केले आहे. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती, जामनगर, पोरबंदर आणि मडगाव यांसारख्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या कामासाठी त्यांनी वेळोवेळी अनेक राजकीय नेत्यांशी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य व्हावा, याच प्रामाणिक भावनेतून त्यांनी हे कार्य पूर्ण केले. हीच जनसेवेची तळमळ आता त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून व्यापक स्तरावर न्यायची आहे.
निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका मांडताना जिमन म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या चौकटीत न अडकता जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा पंचायत समिती गणातील दुर्गम गावांमधील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या एसटी प्रवासाच्या अडचणी, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था हे त्यांचे मुख्य अजेंडा असणार आहेत. सरकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे आणि जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे हाच त्यांचा मुख्य संकल्प आहे. तसेच, ज्या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य स्मरले जाते, त्या कसबा संगमेश्वरमध्ये केवळ स्मारकापुरते मर्यादित न राहता पर्यटन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.
सध्याच्या राजकीय स्थितीत एका सुशिक्षित आणि समाजसेवेची जाण असलेल्या तरुणाने निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. महिला, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन देत त्यांनी विकास आणि विश्वासार्हता या जोरावर मतदारांना कौल देण्याचे आवाहन केले आहे. एक युवा आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून संदेश जिमन यांच्या उमेदवारीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







