GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत अवैध दारू विक्रीविरोधात मद्य परवानाधारकांचे एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

Gramin Varta
3 Views

रत्नागिरी: जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या आणि बनावट दारूच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात मद्य परवानाधारकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या परवानाधारक व्यावसायिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अवैध दारू विक्रीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य आणि गोवा बनावटीची दारू खुलेआम विकली जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, शिवाय नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या परवानाधारकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा पाढा यावेळी आंदोलकांनी वाचला. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर या बनावट दारूमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

संबंधित उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाने या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडावे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील मद्य परवानाधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, प्रशासनाकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3348161
Share This Article