दापोली: तालुक्यातील साकडे बौद्धवाडी येथील एका चिरेखाणीवर चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे ६० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक कॉपर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फिर्यादी प्रवीण सहदेव मर्चडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी २९ एप्रिलच्या रात्री ११ ते ३० एप्रिलच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान साकडे येथील ‘गोरजाईचा कातळ’ परिसरात असलेल्या चिरेखाणीत घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, प्रवीण मर्चडे यांची साकडे बौद्धवाडी परिसरात चिरेखाणी असून तिथे कामासाठी थ्री फेज इलेक्ट्रिक वायरचा वापर केला जातो. घटनेच्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे काम बंद करून सर्वजण घरी गेले असता, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने खाणीच्या परिसरात प्रवेश केला. चोरट्याने तिथे असलेली काळ्या रंगाचे कोटिंग असलेली, साधारण १०० मीटर लांबीच्या दोन महागड्या कॉपर वायर कोणाचीही संमती न घेता स्वतःच्या फायद्यासाठी कापून चोरून नेल्या. सकाळी मर्चडे खाणीवर आले असता त्यांना वायर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
या चोरीमुळे खाणमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कामातही व्यत्यय निर्माण झाला आहे. प्रवीण मर्चडे यांनी ३० एप्रिल रोजी दुपारी दापोली पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (पूर्वीचा भारतीय दंड संहिता) कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२६ अन्वये नोंद केला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील संशयित हालचालींची चौकशी केली जात आहे. ग्रामीण भागात चिरेखाणीसारख्या ठिकाणी होणाऱ्या या चोरीच्या सत्रामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.






